मीच जगाचा प्रकाश आहे

मीच जगाचा प्रकाश आहे

पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


योहान 8:12

अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.


यशया 9:2

परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?


स्तोत्रसंहिता 27:1

कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


२ करिंथ 4:6

पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणार्‍या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.


रोमकरांस पत्र 8:10-11

कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला


इफिसकरांस पत्र 5:8

पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.


1 योहान 1:7-9

तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.


मत्तय 5:14-16

तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.


योहान 1:5

स्तोत्रसंहिता 91 – सर्वसमर्थाच्या पंखांखाली आश्रय

1  
जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.

2  
परमेश्वराला मी “माझा आश्रय, माझा दुर्ग” असे म्हणतो; “तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.”

3  
कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील.

4  
तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.

5  
रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण

6  
काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही.

7  
तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही

8  
मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल.

9  
कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस

10  
म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही.

11  
कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.

12  
तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.

13  
तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील; तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील.

14  
माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.

15  
तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन

16  
त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.

स्तोत्रसंहिता 91

Psalm 91 in English

ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री

इफिसकरांस पत्र 6:10-18

10  
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.

11  
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.

12  
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.

13  
ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.

14  
तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा

15  
शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा

16  
आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.

17  
तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.

18  
सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा.

Ephesians 6 in Marathi

Ephesians 6 in English

प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे

प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे

4  
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही

5  
ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही

6  
ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते

7  
ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.

8  
प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.

9  
कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो

10  
पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.

11  
मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.

12  
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.

13  
सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.

1 Corinthians 13 in Marathi

1 Corinthians 13 in English

क्रिसमस बायबल वस्तू

क्रिसमस बायबल वस्तू

हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.

मीखा 5:2

ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.

यशया 7:14

असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”

मत्तय 1:20-21

देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.

योहान 3:16

कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.

यशया 9:6

शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.

योहान 1:14

परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.

गलतीकरांस पत्र 4:4-5

तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.

लूक 2:10-11

इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”

लूक 2:13-14

राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पाहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो, जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला; नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्‍या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.

मत्तय 2:9-12