1
दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्यांचा हेवा करू नकोस.
2
कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.
3
परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल
4
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.
5
आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
6
तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.
7
परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.
8
राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते.
9
दुष्कर्म करणार्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.
10
थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही
11
पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.