Posted on 2019-12-232024-11-20 by क्रिसमस बायबल वस्तू हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे. मीखा 5:2 ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील. यशया 7:14 असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” मत्तय 1:20-21 देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16 कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील. यशया 9:6 शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. योहान 1:14 परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. गलतीकरांस पत्र 4:4-5 तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. लूक 2:10-11 इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” लूक 2:13-14 राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पाहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो, जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला; नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. मत्तय 2:9-12